जावळी

 Skip to main content

Toggle navigation

मिसळपाव

साहित्य प्रकार 

नवे लेखन

नवे प्रतिसाद

मिपा पुस्तकं 

मदत पान

मिपा विशेषांक 

दिवाळी अंक २०२०

जावळी

Primary tabs

बघा(active tab)

What links here


दुर्गविहारी in काथ्याकूट

28 Aug 2020 - 7:54 pm

गाभा: 

जावळी म्हणजेच जयवल्ली, 'येता जावळी जाता गोवली' म्हणून मिरवली गेलेली. चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोर्यांची राजधानी. शिवरायांनी ज्यांचा बिमोड केला, जावळी जिंकून स्वराज्य विस्तार केला, अफझलखानाचा कोथळा काढला, आदिलशाही फौजेचा डंका वजावला अशी ती जावळी. .एकबाजूला घनदाट झाडी, महाबळेश्वर , भोरप्या(आता प्रतापगड) रायगड सारखे अभेद्य जंगल आणि किल्ले कपारी आणि तिथूनच कोकणात उतरला तर थेट अरबी समुद्र अशी ही जावळी खोऱ्याची रचना आहे.सातारा जिल्ह्यात प्रतापगड सोडल्यावर महाबळेश्वरकडे जाताना साधारण ३-४ किमी डावीकडे जावळीच्या मोरे घराण्याचे कुळ आहे. हे जावळीचं बेलाग खोरं इतकं अवघड आणि अभेद्य की, १४ व्या शतकात ५००० मुसलमानी फौजा जावळीत गेल्या , त्या परतल्याच नाहीत आणि त्याचं काय झालं याचा ठाव ठिकाण देखील लागला नाही.अशी हि जावळी प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी अशी कोणाची हिम्मत नव्हती.चंद्रराव हे विजापुरकरांचे (आदिलशहा) पिढीजात जहागीरदार होत.

जावळीच्या संस्थानची स्थापना करण्याऱ्या मूळ व्यक्तीचे नाव 'चंद्रराव' असे होते. या चंद्ररावला ६ मुले होती. त्यापैकी थोरल्या मुलाला त्याने स्वत:जवळ ठेवले आणि इतरांना जावळीतील निरनिराळ्या जागा नेमून दिल्या. थोरल्या शाखेत चंद्रारावापासून पुढील ८ पिढ्या झाल्या. चंद्रराव - चयाजी - भिकाजी - शोदाजी - येसाजी - गोंदाजी - बाळाजी - दौलतराव. जावळीचा हा प्रत्येक शाखापुरुष किताब म्हणून चंद्रराव हे नाव धारण करू लागला. चंद्रराव मोर्‍यांनी आठ पिढ्या खपून त्यांनी आपले वैभव एखाद्या सार्वभौम राजासारखे वाढविले होते . मोऱ्यांजवळ १०-१२ हजार फौज होती. महाडपासून महाबळेश्वर पर्यंतचा डोंगरी भाग व बव्हंश सातारा जिल्हा त्यांनी काबीज केला होता. या बाजूने कोकणात उतरणाऱ्या हातलोट व पार घाटातील माल वाहतुकीची जकात मोरे वसूल करीत. त्यांच्या अमलाखाली महाबळेश्वर, जावळी(कोयनेचे खोरे), वरंधघाट, पारघाट, शिवथर, रायगड इतका प्रांत होता.

बहामनी राज्याच्या उदयानंतर मराठे, पादशहाकडे नोकरी करून मनसबदारी मिळवुन राहू लागले. अश्या मराठ्यामध्ये चंद्रराव मोरे हा विजापुरी चाकरी करत होता. इथून पुढे बखरीत चंद्रराव मोरे यांची हकीकत सुरु होते.

चंद्रराव मोरेंची ओळखच चंद्रराव मोर्‍यांच्या बखरीचे बखरकार वाघाच्या शिकारीच्या प्रसंगातून करवून देतो. विजापूरच्या डोणप्रांती पातशहा शिकारीला गेला होता. शिकारीला एक वाघ कोणालाच दाद देत नव्हता. तेव्हा चंद्रराव मोरे वाघाला मारायला पुढे सरसावतात. या प्रसंगाचे वर्णन सुरेख केले आहे. वाघ समोर आल्यावर मोरे म्हणतात 'उठ कुत्र्या बसलास काय. तू आमचे एक कुत्रे आहेस !'. यातून बखरकाराने चंद्ररावच्या 'मर्द आदमी, आडेल शिपाई, आजदादेघरचा राउत मर्दाना ' या विशेषणातुन दर्शवलेली रग दिसते. शेवटी वाघासोबतच्या रणात मोऱ्यांचा विजय होतो. बादशाह चंद्ररावाना इनाम मागायला सांगतो. चंद्रराव मुऱ्हे प्रांतातली जावळी आणि राजे हा किताब मागतात. बादशाह मागितलेला इनाम देतो आणि सोबत हत्ती, घोडा, कडी, मोतियांची जोडी देतो.

पण चंद्रराव हुशार; इतक्यावर थांबत नाहीत. मोरे म्हणतात आता आम्ही राजे पण आमची भावकी, नातेवाईक आमच्या तोलामोलाचे नाही राहिले. आम्ही सोयरिक करायची तर कोणाकडे करावी. असे साधारण कारण पुढे करून बादशाह कडून आपल्या नातेवाईंकाना पदव्या, मानमरातब मागून घेतात. ते सर्व मान पुढीलप्रमाणे :

१२ जणांना 'राव'किताब : पडेमकर, कुंभारखाणी सुर्वे, सडेकर शिंदे, पाकडे, महामुलकर, गणसावंत, खोपकर, हालमकर हंबीरराव, दलवीरराव, हंबीरराव, येरुणकर , घासेराव चव्हाणराव.

'राव' किताब आपल्या भाऊबंदाना : देशकरराव, मुदोसकरराव, कलाकराव, हाटकेटकर, वीरमणकरराव, बिरवाडकर, आस्तनकर, मुधगावकर.

६ पुत्रांना खालील मरातबी : प्रतापराव जोरामध्ये, हणमंतराव जावलीमध्ये, गोविंदराव महीपतगडी, चयाजीराव जावळी राज्यासनिध, शिवतरकर यसवंतराव यांना बादशाह कडून हिरवे निशाण आणि दौलतराव (यांना काय दिले ते नमूद नाही )

या सर्व माराताबी आणि इनामे घेउन १२,००० सैन्यासहित चंद्रराव मोरे जावली वर चालून गेले. जावळी काबीज झाली. मोऱ्यानी तिथे राजगादी सुरु केली. पुढे हि गादी ८ पुरुषांकडून चालवली गेली असे संकेत लिहिलेत (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष). त्या ८ पुरुषांची नावे अशी : चयाजी राजे, भिकाजी राजे, शोदाजी राजे, येसाजी राजे, गोन्दाजी राजे, बाळाजी चंद्रराव राजे आणि दौलतराव राजे.





जावळी प्रांताचा नकाशा


जावळी परिसरातील किल्ले, घाटवाटा आणि प्रमुख गावांचा नकाशा


जावळी परिसरातील घनदाट जंगल



जावळीतील समाधी



मोरेंच्या जावळीचे दक्षीण टोक ,हातलोट घाट व मधुमकरंदगड


जावळीतील अभेद्य दुर्ग, किल्ले प्रतापगड

पण मग जावळीचा मुलूख म्हणजे आजचे कुठले तालुके किंवा गावं सांगता येतील? जर नकाशावर वर pin point करायची झाली तर नेमकी ठिकाणं कुठली दाखवता येऊ शकतात? या विषयी ऐतिहासिक कागदपत्रात कुठे काही उल्लेख सापडतात काय? याबाबतीत शोध घेतला असता कुर्डुगडाला पासलकर आणि मोरे यांच्यात लढाई झाली होती आणि कुर्डुगड हा ताम्हीणी घाटाजवळ आहे म्हणून ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाट दरम्यान जावळीचं खोरं येत असावं. मावळाला लागुन खाली कोकणातील काही भाग मोरेंच्या अधिपत्याखाली येत असावा. मावळातल्या देशमुखात आणि मोरेंच्यात कायम कुरबुरी चालत असत. अफजलखान प्रकरणाच्या वेळी मोरेंची तक्रार गुंजन मावळातल्या हैबतराव शिळीमकरांनी केली होती.



एल्फिन्स्टन पॉईंट येथून दिसणारा सहय कडा. किल्ले कांगोरी, चंद्रगड, दुर्गाडी, तोरणा, राजगड

याविषयी अजून काही भौगोलिक माहिती मिळती आहे काय याबद्दल शोध घेतल्यावर जावळी सुभा हा घाटावर आणि कोकणात असा दोन्ही भागात येतो अशी माहिती मिळाली. शाहू दफ्तरात (४) या सुभ्यांच्या याद्याच दिलेल्या आहेत. तसेच संक्राजी मल्हार याने स्वराज्याच्या सनदेमधे (५) जावळी प्रांताच्या तर्फांची यादी दिलेली आहे. त्यावरून हा प्रांत सिद्ध केला आहे.

यात एकूण अठरा तर्फा आहेत. त्या अशा...

१) सुभा मंगळगड, तर्फा ५ - चांढवे, शिवथर, बीरवाडी, नाते, महाड. एकूण गावे २०७.

२) सुभा जावळी, तर्फा ७ - जोर, बारामुऱ्हे, कदंब, सोनाटसोळशे, आटेगाव, विन्हेरे, कोंढवी. एकूण गावे १९५.

३) सुभा व्याघ्रगड, तर्फा ५ - तांबी, बामणोली, हेळवाक, वनवली, मेसे(मेढे). एकूण गावे १५१.

४) सुभा महिपतगड, तर्फ १ - तेतले. एकूण गावे १८.

म्हणजे या यादीनुसार लहान मोठी अशी सर्व मिळून तब्बल ५६४ गावं मोरेंच्या अधिपत्याखाली येत होती.

सुभा*, तर्फ ही नावं जरा जड वाटतात ना? थोडं सोपं करून सांगतो.

प्रांत म्हणजे सध्याच्या भाषेत राज्य म्हणजे जावळी प्रांत/ राज्य. सुभा म्हणजे जिल्हा*. म्हणजे एकूण सुभे/ जिल्हे ४. आणि तर्फ* म्हणजे तालुका. ते झाले १८. तर्फ/तालूक्यात येणारी एकूण गावं ५६४. झालं कि नाही सोपं.

म्हणजेच वर दिलेल्या गावांची नेमकी ठिकाणं पाहता ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाटांदरम्यान जावळी प्रांत/ खोरं येतं याची खात्री पटते.

खरंतर शाहू दप्तरात या सगळ्या याद्या आल्या आहेत आणि त्यात शंका घ्यायला थोड्याफार नक्कीच जागा आहेत. पहिलं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हे सुभे सांगितले आहेत त्या त्या ठिकाणी मोरेंचं वास्तव्य नक्कीच असणार, म्हणजे त्या ठिकाणी मोरेंचे राहते वाडे असायलाच हवेत. बरं त्याचं ठिकाण, तेही संरक्षण दृष्टीनेही चपखल असायला हवं. आजूबाजूला सैन्य मुक्काम करू शकेल, दारूगोळा ठेवता येईल अशा जागाही असायला हव्यात आणि अगदी युद्धाच्या वेळी गरजच पडली तर बाजूच्या सुभ्यात असणारं मोरेंचं सैन्य चटकन मदतीला येऊ शकेल अशा ठिकाणी सुभा असायला हवा.

उदाहरणादाखल असं सांगता येऊ शकेल कि शिवथरघळीच्या वरच्या बाजूला चेराववाडीच्या हद्दीत मोरेंचा वाडा आहे. पण शिवथर हा एक सुभा न सांगता एक तर्फ सांगितलेली आहे.

प्रत्येक सुभ्यात एक एक मोरे व्यवहार/ राज्य करीत असे. (अफजलखान प्रकरणानंतर जावळीचे मोरे रायरीच्या मोऱ्यांच्या आश्रयास गेले होते. ) ते एकमेकांचे नातेवाईक असुनही त्यांच्यात भाऊबंदकी नक्कीच होती.

एकूणच काय तर महाराजांना जावळीची अभेद्य जागा हवीच होती आणि त्यासाठी एक कारणही हवंच होतं, मग ते कोणतंही का असेना.

किल्ले रायरी ते किल्ले खेळणा? आणि कोयना काठ ते सांप्रतचा मुंबई-गोवा महामार्ग हा जावळीचा आद्य मुलुख आहे. त्या मुलखात...

१) शिवथर - यशवंतराव

२) जोर - हणमंतराव

३) जांभळी - गोविंदराव

४) महिपतगड - दौलतराव

५) केवनाळे व वाकण - बागराव

६) आटेगांव तर्फेतील देवळी - सूर्यराव

७) देवळी - भिकाजीराव

८) खेळणा - शंकरराव

हे आठ अनभिषिक्त मोरे घराण्यांतील आद्य राजे राज्य करीत होते. (६)

सावित्री नदीच्या उगमापासून मुखापर्यंत मोरे घराण्याने

१) शिंगोट्याला श्री महाबळेश्वर

२) पर्वतला श्री मल्लिकार्जुन

३) चकदेवला श्री शैल्य चौकेश्वर

४) घोणसपूरला श्री मल्लिकार्जुन

५) तळदेवला श्री तळेश्वर

६) गाळदेवला श्री गाळेश्वर

७) धारदेवला श्री धारेश्वर

८) माळदेवला श्री माळेश्वर

इत्यादी आठ की सात? शिवपुऱ्या निर्माण केल्या. (६)

जावळीप्रांतात जांभूळखोरे, जोरखोरे, शिवथरखोरे, कांदाटखोरे, ताजमहाल?, बामणोली, चतुर्बेट, सोलसखोरे, इत्यादी १८ महाल? (विभाग) होते. (६)

जावळी मुलखातल्या घाटांबद्दल सांगायचं झालं तर पारघाट, कोंडेनळी घाट, रडतोंडी घाट, ढवळाघाट, हातलोटचा घाट, सापळाखिंड, कावल्या-बावल्या, अन्नछत्राची नाळ, बोराटयाची नाळ, वरंधा-घाट, आंबेनळीघाट इ.लहान मोठे सुमारे ६०-६२ घाट होते. (६) ते पुढीलप्रमाणे(७)...

१) ताम्हीणी

२) सातपायरी/सातीपडी

३) सवत्या

४) निसणी/देव

५) लिंग्या

६) थिबथिबा

७) कुंभा

८) कावळ्या

९) बोचेघोळ

१०) निसणी

११) गायनाळ

१२) बोराटा नाळ

१३) सिंगापूर नाळ

१४) आग्यानाळ

१५) फडताड नाळ

१६) शेवत्या घाट

१७) मढेघाट

१८) उपांड्या

१९) आंबेनळी

२०) गोप्या

२१) सुपेनाळ

२२) भोवऱ्या

२३) खुटा

२४) पाळदार

२५) सुनेभाऊ/पारमाची

२६) वरंध

२७) वाघजाई

२८) कुंभनळी

२९) चिकणा

३०) चोरकणा

३१) अस्वलखिंड

३२) ढवळे

३३) सापळखिंड

३४) सावित्री

३५) दाभिळटोक

३६) रानकडसरी

३७) आंबेनळी

३८) केवनाळे

३९) पारघाट

४०) क्षेत्रपाळ

४१) कुडपण

४२) हातलोट

४३) कोंडनाळ

४४) अंगठेसरी

४५) नळी

४६) तेल्या

४७) मारखिंड

४८) कांदाट

४९) आंबिवली

५०) शिडीडाक

५१) रघुवीर

५२) भैरोबा

५३) नागसरी

५४) निवे

५५) तिवरे

५६) अंगठेसर

५७) कलावंतीणीची डाक

५८) मोरंगेची व्हळ

५९) सर

६०) शिडीची वाट

६१) डिचोली

६२) नांदिवसे

६३) दुर्गाची सरी

६४) पोफळी

या व्यतिरिक्त नवीन सापडलेल्या लहानमोठ्या अशा बऱ्याच घाटवाटांची नावं इथं सांगता येतील, जी वरील यादीत नाहीत.

किल्ल्यांविषयी सांगायचं तर रायगड, लिंगाणा, चंद्रगड, खेळणा?, कांगोरी, कावळया, मकरंदगड, सोनगड, चांभारगड, महिपतगड, प्रतापगड (भोरप्या), रसाळगड, सुमारगड, जननीदुर्ग, वासोटा इ. किल्ले होते. (६) (७)

१) कुर्डुगड

२) मानगड

३) रायरी

४) लिंगाणा

५) कोंढवी

६) महिमंडणगड

७) जंगली जयगड

८) पन्हाळघर

शब्दसुची -

१) जिल्हा - (पु.) [अ. झिलम]

प्रांताचा भाग, पर्गणा

२) तर्फ/तरफ - (स्त्री) [ अ. तर्फू - तरफू]

दिशा, बाजू, पक्ष, तालुका, पेटा.

३) सुभा - (पु.) [फा. सुबा] प्रांत, प्रांताधिकार,

प्रांताधिकारी. "यानें अदावतीनें सुभा ( = सुभेदाराकडे )

जाऊन चुगली केली"

(वाड - बाबा २/३)

म्हणजेच वर दिलेल्या गावांची नेमकी ठिकाणं पाहता ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाटांदरम्यान जावळी प्रांत/ खोरं येतं याची खात्री पटते.

खरंतर शाहू दप्तरात या सगळ्या याद्या आल्या आहेत आणि त्यात शंका घ्यायला थोड्याफार नक्कीच जागा आहेत. पहिलं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हे सुभे सांगितले आहेत त्या त्या ठिकाणी मोरेंचं वास्तव्य नक्कीच असणार, म्हणजे त्या ठिकाणी मोरेंचे राहते वाडे असायलाच हवेत. बरं त्याचं ठिकाण, तेही संरक्षण दृष्टीनेही चपखल असायला हवं. आजूबाजूला सैन्य मुक्काम करू शकेल, दारूगोळा ठेवता येईल अशा जागाही असायला हव्यात आणि अगदी युद्धाच्या वेळी गरजच पडली तर बाजूच्या सुभ्यात असणारं मोरेंचं सैन्य चटकन मदतीला येऊ शकेल अशा ठिकाणी सुभा असायला हवा.


 

हा फ़ोटो वरंधा घाटातुन घेतला आहे. त्या मधे, सुंदरमठ हा खालच्या बाजुला दिसत आहे तसेच वर जी घरे दिसत आहेत त्या ठिकाणी पुर्वी चंद्रराव मोरे यांचा वाडा होता. ज्यांच्या कडुन छत्रपति शिवाजी महाराजांनी जावली जिंकुन घेतली.



चंद्रराव मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष

 

उदाहरणादाखल असं सांगता येऊ शकेल कि शिवथरघळीच्या वरच्या बाजूला चेराववाडीच्या हद्दीत मोरेंचा वाडा आहे. पण शिवथर हा एक सुभा न सांगता एक तर्फ सांगितलेली आहे.


श्री राम वरदायिनी


पार गावातील श्री राम वरदायिनी व श्री वरदायिनीचे मंदिर.


जावळी गावातील चंद्रराव मोरेंच्या वाड्याची जागा






राजे चंद्रराव मोरे यांचे कुलदैवत श्री नीरपजि देवी मंदिर उचाट ,सातारा येथे स्थित आहे. जावळीचे राजे चंद्रराव मोरे यांचे बंधु गोविंदराव राजे मोरे (१४९० ते १५१०) यांचा निवासी वाडा चंद्ररावांचा वाडा देखील पहाता येतो.


शिवाजी राजांचा जावळी प्रांतात हस्तक्षेपः-

या शाखेतला आठवा पुरुष दौलतराव निपुत्रिक होता.सन १६४७ साली दौलतराव मोरे निपुत्रिक वारला, म्हणून त्याची आई माणकाई हिने कृष्णाजी बाजी यास दत्तक घेतले आणि जावळीच्या गादीवर बसवले. वास्तविक दत्तक घेतलेल्या चंद्ररावाचे नाव 'येसाजी' होते हे २२ डिसेंबर १६५७ सालच्या एका महजरावरून दिसून येते. महजरातील या उल्लेखाचा शिवभारत व मोऱ्यांची बखर याच्याशी मेळ घातला की , कृष्णाजी व बाजी हे त्याचे मुलगे होते असे अनुमान निघते. या दत्तक प्रकरणा दरम्यान काही कारणास्तव आदिलशाहीकडून मदत न घेता माणकाईने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले. आता नवा 'चंद्रराव' नेमण्याचा अधिकार आदिलशाहीचा. परंतु, दौलतरावाची आई माणकाईने परस्परच शिवथरच्या यशवंतराव मोरेच्या वंशातील कृष्णाजी बाजीला दत्तक घेतले व त्याची चंद्रराव पदावर स्थापना केली. मोरे घराण्यातील काहींचा याला विरोध होता. माणकाईने शिवाजीराजांकडे सहकार्य मागितले. राजांनी कृष्णाजी बाजीच्या चंद्रराव पदाला आपला पाठिंबा दिला. शिवाजीराजे व कृष्णाजी बाजी यांच्याविरुद्ध विजापूर दरबारात तक्रारी गुदरल्या गेल्या. परंतु फत्तेखानाचा पराभव, दिल्ल्लीचे समकालीन राजकारण, शहाजीराजेंची अटक व सुटका या सर्वांमुळे जावळी प्रकरणात आदिलशहाने लक्ष घातले नाही.

सन १६४९ साली अफजलखानाची वाईचा सुभेदार म्हणून नेमणूक झाली. जावळी भाग हा वाई प्रांतात येतो. अफजलखानाने नव्या चंद्ररावाची नेमणूक गैर ठरवली. आणि कान्होजी जेधे यांना जावळीवर हल्ला करण्याचा हुकूम दिला. परंतु जावळीवर चालून जावे तर शिवाजीमहाराजांनी जमविलेले राजकारण विस्कटले जाईल आणि हल्ला नाही करावा तर विजापूर दरबारी आपली निष्ठा नाही हे अफजलखानाला समजेल अशा दुहेरी कात्रीत सापडले. कान्होजींनी शिवाजी महाराजांना सल्ला विचारला. महाराजांनी कान्होजींना खानाशी बोलणे करण्याचा सल्ला दिला. कान्हाजींनी आपले हेजीब आबाजीपंतांना खानाकडे पाठविले व आपल्या अटी कळविल्या. या वाटाघाटी बराच काळ चालू राहिल्या. त्याकाळात दक्षिणेत छोट्या छोट्या राजांनी पुन्हा उठाव चालू केले. परिणामी आदिलशहाने अफजलखानाला वाईहून परत बोलविले आणि कर्नाटकात मोहिमेवर पाठविले.सन १६४९ च्या काही दिवस आधी चंद्ररावचा चुलत भाऊ हणमंतरावने जोर खोरे घेतले. हा भाग अफजलखानकडे असलेल्या वाई परगण्यातला होता.

हणमंतरावाकडून जोर खोरे घेण्यासाठी अफजलखानने केलेली चाल पुढे सरकली नाही. ह्यानंतर मोरे घराण्याच्या हलचालींमुळे शिवरायांच्या मुलुखातील प्रजेला उपसर्ग होऊ लागला. मोरे त्याचे शेजारीच असल्याने त्याचा काहीतरी बंदोबस्त करणे भाग होते.

इ.स. १६४७ मध्ये माणकाईने दत्तक घेतलेल्या चंद्ररावास शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर बसण्यात मदत केली होती ते यासाठीच की या उपकारामुळे जावळीकर मोरे हे आपले मित्र होतील व हिंदवी स्वराज्य-संवर्धनात त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होईल.परंतु लवकरच चंद्ररावाने महाराजांशी उघड शत्रुत्व आरंभले. स्वराज्य संवर्धनामुळे नकळत मोऱ्यांच्या स्वतंत्र सत्तेला धोका उत्पन्न झाला. शिवाजी महाराजांसारखा महत्वाकांक्षी राजा शेजारी असल्याने एकतर चंद्ररावाला त्यांचे प्रभुत्व मान्य करावे लागणार किंवा आज ना उद्या त्या दोघांमध्ये वितुष्ट येणार हे उघडच होते. माणकाईने येसाजीस दत्तक घेतले व जावळीच्या चंद्रराव पदावर बसण्यासाठी महाराजांची मदत घेतली, त्यामुळे येसाजीने आपल्या सांगण्याप्रमाणे वागावे अशी महाराजांची अपेक्षा असणे चूक नव्हते. परंतु तसे करण्यास चंद्रराव तयार नसल्याने महाराज व चंद्रराव यांच्यात वितुष्ट आले.

१६५६ नंतर जावळीचे प्रकरण पुन्हा रंगले. राजांनीच कृष्णाजी मोरेची चंद्रराव पदावर स्थापना केली व अफजलखान जेव्हा हि व्यवस्था मोडू लागला तेव्हा राजकारण करून त्यांनी या चंद्ररावाला वाचविले होते. परंतु काही काळाने तो हे सर्व विसरला आणि उन्मत्त झाला.महाराजांचे उपकार विसरून या चंद्ररावाने आदिलशाही निष्ठा जाहीर करून महाराजांना शह देण्यास आरंभ केला तो असा,

१) बिरवाडी टप्पाखालील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावाने त्यांना हुसकून लावले.ती गावे स्वतः बळकावली. इ.स. १६५१-५२ मध्ये हे पाटील महाराजांकडे मदत मागण्यासाठी आले, महाराजांनी त्यांची वतनावर पूर्णस्थापना केली.चंद्रराव स्वाभावीकच चिडला असल्यास नवल नाही.

२) पुढे लवकरच स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुळकर्णी 'रंगो त्रिमल वाकडे' याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला आणि शिवाजीराजे शासन करतील या भीतीने तो जावळीस आश्रयास आला.चंद्ररावणे त्यास आश्रय दिला आणि महाराजांची नाराजी स्वतःवर ओढावून घेतली.

३) चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्रराव यांचे पूर्वीपासून वैर होते त्यामुळे चंद्ररावाने त्यास जीवे मारले. या रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने रोहीडेखोऱ्यात आला.चंद्ररावाने सुद्धा त्याचा पाठलाग सोडला नाही. स्वराज्य कक्षेत असणार्या रोहीडेखोऱ्यात घुसून त्याने लुमाजीला ठार केले.

४) अशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करणाऱ्या चंद्ररावाने आता भेदनीतीचा अवलंब केला, गुंजणमावळात देशमुखी कोणाकडे यावरून शिंदे-चोरघे-शिलिमकर यांच्यात जुना वाद होता. शिलिमकरांनी यापूर्वी फतहखान मोहिमेत महाराजांना साथ दिली होती, त्यामुळे साहजिकच महाराजांनी त्यांचा पक्ष देशमुखीसाठी उचलून धरला. परंतु चंद्रराव हे शिलिमकरांचे मामा असल्याने मन वळवण्याच्या प्रयत्न चंद्ररवाने केला.हे वृत्त समजताच महाराजांनी शिलिमकरांना ताबडतोब अभयपत्र पाठवून मनधरणी केली.

एकीकडे शिलिमकरांना अभयपत्र पाठवले तर दुसरीकडे शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला जरबेचे पत्र पाठवले , त्यावर प्रतिक्रिया म्हणून 'येता जावली जाता गोवली' अशा शब्दात धमकीवजा उत्तर चंद्ररावाकडून मिळाले (मो.ब.), परंतु मोरे बखरीत आलेला पत्रसंवाद कालोकाल्पित वाटतो.

त्या पत्रात महाराज लिहितात.

"तुम्ही मुस्तफद राजे म्हणवितां. राजे आम्ही. आम्हास श्रीशंभूनें राज्य दिधलें आहे तर तुम्ही राजे न म्हणावें. आमचे नोकर होऊन आपला मुलुख खाऊन हामराहा चाकरी करावी. नाहीतर बदफैल करून बंद कराल, तर जावळी मारून तुम्हांस कैद करून ठेवुं."

उत्तरादाखल चंद्ररावाने महाराजांस लिहिले कि, "तुम्ही काळ राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणें दिधलें? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलीयावरी कोण मानितो? येता जावली जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला तर, उदईक याल तर आजच यावे - आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबळेश्वर. त्याचे कृपेने राज्य करितों. येथे उपाय कराल तर अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल."

चंद्रराव मोऱ्याचे हे उर्मट उत्तर ऐकून महाराज परम संतप्त झाले. त्यांनी मोऱ्याला अखेरचे एक पत्र पाठविले. त्यात ते म्हणतात,

"जावली खाली करोन, राजे न म्हणोन, मोरचेल दूर करून, हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची काही चाकरी करणे. इतकीयावर बदफैली केलीया मारले जाल."

या पत्रानेही चंद्ररावाचे डोळे उघडले नाहीत. स्वतःच्या बळाचा अतिरेकी अभिमान चंद्ररावाने महाराजांना पुन्हा डिवचून लिहिले, "दारुगोळी महझूद आहे. काही बेजबाबास खुते घालून लिहिले ते कासियास ल्याहाविले? थोर समर्थ असो."

समोपचाराने जावळी प्रकरण प्रकरण मिटत नाही हे आता स्पष्ट झाले होते. त्यामुळे बळाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नव्हते.पण जावळीवर आक्रमण करणे तितके सोप्पे नव्हते. कारण विजापूरकर चंद्ररावाची पाठराखण करीत होता. वाईचा सुभा अफजलखानाकडे होता.शाहजीराजे सुद्धा नुकतेच अटकेतून मुक्त झाले होते. त्यामुळे अनुकूल संधीची वाट पाहणे भाग होते.

लवकरच अशी अनुकुलता महाराजांना लाभली. विजापूरकर आदिलशाह मरणासन्न झाला होता, त्यामुळे गादीसाठी विजापुरास अंतर्गत कलह सुरु झाले होते.अफझलखानही कर्नाटकात रवाना झाला होता, अशावेळी जावळीवर हल्ला केल्यास चंद्ररावाच्या मदतीला लगेच कोणीतरी धावून येईल ही शक्यता कमी होती. म्हणून जावळीवरील मोहिमेला सुरवात झाली, ती जोर खोऱ्यावरील हल्ल्याने. जेधे शकावली नुसार-

"त्यावरी जाउलीवरी मोहीम केली. कान्होजी नाईक यांस व अवघ्या देशमुखांस जामावानसी बोलाविले. जांबलीस मोरे होते. ते जेध्यांनी आधीच पिटाळून लाविले होते. जांबलीस मोरे कोणी नव्हते. जोरामध्ये हनमंतभाऊ मोरे होते. त्यावरी राजश्री स्वामींनी (शिवाजी) रघुनाथ बल्लाळ सबनीस पुण्याहून स्वरांच्याजमावानसी पाठवले. त्यांनी हनमंतभाऊ यास मारून जोर घेतले, जाउली मात्र राहिली होती."

शिवरायांनी चंद्ररावला लिहीले होते की त्याने राजे ही पदवी वापरु नये व शिवरायांशी इमान राखावा. हा उल्लेख मोरे बखरीमधे सापडतो. ह्यावर चंद्ररावाच्या उत्तराने शिवरायांबरोबरचे संबंध धोक्यात आणले. त्यामुळे हे स्पष्ट होते की शिवरायांचे जावळीवरचे आक्रमण मुख्यतः राजकारणासाठीच होते. सभासद बखरीत शिवरायांच्या जावळी युद्धाचे कारण स्पष्ट होते ...

चंद्रराव मोरे यांस मारल्याविरहित राज्य साधत नाही ।


जावळीवर हल्ला

आदिलशहाच्या परवानगीशिवाय येसाजी चंद्ररावपदी बसल्याने चंद्ररावाचे आदिलशहाशी संबंध बिघडलेले होते. त्यातच जानेवारी १६५६ मध्ये औरंगजेब कुतुबशाहीवर आक्रमण करण्यासाठी उतरला होता. त्यावेळी कुतुबशाहीच्या मदतीसाठी आदिलशाही सैन्य सरहद्दीवर गोळा झाले होते. त्यामुळे आदिलशहाकडून चंद्ररावाला कोणतीही मदत मिळण्याची शक्यताच नव्हती. याचा फायदा घेऊन महाराजांनी तीच वेळ जावळीवर स्वारी करण्यासाठी निवडली. सामोपचाराने जावळी प्रकरण मिटत नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे बळाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. रघुनाथ बल्लाळ सबनीस, संभाजी कावजी कोंढाळकर, सूर्यराव काकडे, कान्होजी नाईक जेधे, बांदल देशमुख व स्वतः महाराज एवढे सर्व या मोहिमेवर जाण्याचे ठरले. चंद्ररावाचे प्रमुख कारभारी व सैन्य जावळीच्या जोहोरबेट, चतुर्बेट, शिवथर खोरे, व खुद्द जावळी या ठिकानी विखुरलेले होते. या सर्व ठिकाणी अकस्मात हल्ला करून चंद्ररावाची जावळी काबीज करण्याचे ठरले. व त्यानुसार संभाजी कावजी चतुर्बेटावर, रघुनाथ बल्लाळांनी जोहोरखोऱ्यावर तर काकडे, जेधे, बांदल व खुद्द महाराजांनी जावळीवर हल्ला केला.



निसनीच्या वाटे वरून दिसणारे विहंगम दृश्य


दरे गावर उतरणारी हि डोंगर धार म्हणजेच निसनीची वाट

महाराजांच्या जावळीवरील स्वारीची सुरुवात जोर खोऱ्यावरील हल्ल्याने झाली. याचे कारण असे की, जावळीच्या खोऱ्यात उतरण्याचा मार्ग महाबळेश्वराच्या पठारावरून होता. १७ व्या शतकात वाईवरून महाबळेश्वराच्या पठारावर जायची वाट तायघाटातून होती. पण वाई परगणा त्यावेळी आदिलशाहीच्या ताब्यात असल्याने तो मार्ग त्यांच्या उपयोगाचा नव्हता. तेव्हा हिरडस मावळातून रायरेश्वराच्या पठारावरून जांभूळ खोऱ्यात व तिथून जोर खोऱ्यात जाणारी वाट महाराजांच्या सैनिकांनी घेतली. जोर खोऱ्यातून महाबळेश्वरच्या पठारावर जाणारी वाट गणेशदऱ्यातून जाते. जेधे करिन्यात दिलेल्या हकीगतीनुसार, जांभळीच्या मोर्‍यांवर हल्ला करून त्यांना जेध्यांनी आधीच पिटून लावले होते. त्यामुळे जांभळीस कोणी मोरे नव्हते. त्यानंतर महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना स्वारांच्या जमावानिशी पाठविले. त्यांनी हणमंतराव यास मारून जोर घेतले. जावळी मात्र राहिली होती.



      

यानंतर शिवाजीराजे पुरंदरवरून जावळीवर आक्रमणार्थ दहा हजारांची फौज घेऊन निघाले (

यानंतर शिवाजीराजे पुरंदरवरून जावळीवर आक्रमणार्थ दहा हजारांची फौज घेऊन निघाले (शि.का.). महाराजांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या. मोठी तुकडी रडतोंडी घाटाच्या दिशेने गेली तिकडे मोऱ्यांच्या सैन्याने प्रतिकार केला. छोट्या तुकडीसोबत खासे महाराज महाबळेश्वर मार्गे निसणीच्या घाटाने जावळीत उतरले. त्यांना विशेष प्रतिकार झालाच नाही. दुपारपर्यंत मोठी फौजही तिथे पोहचली आणि शिवाजीराजांनी जावळी हस्तगत केली. शके १५७७ मन्मथ संवछरी राजश्री सिवाजीराजे यांनी पौष चतुर्दशीस जाऊन जावली घेतली [१५ जानेवारी १६५६] (जे.श.)



मुरारबाजी देशपांडे

मुरारबाजी देशपांडे


चंद्रराव मोऱ्याकडून प्रतापराव मोरे, हणमंतराव मोरे, मुरारबाजी देशपांडे हे सर्व महाराजांच्या सैन्याशी ठिकठिकाणी झुंजू लागले. परंतु महाराजांच्या बळापुढे चंद्ररावाचे बळ तोडके पडू लागले. खासा चंद्रराव व मुरारबाजी यांनी जावळी बराच वेळ लढविली. पण अखेर त्याला माघार घ्यावी लागली. तो आपल्या बायकामुलांसह रायरी किल्ल्यावर लपून बसला. जावळी महाराजांनी सर केली. तो दिवस होता मन्मथ नाम संवत्सर शके १५७७ पौष वद्य चतुर्दशी म्हणजे मंगळवार १५ जानेवारी १६५६.

जावळीचे व्यवस्था नीट लावल्यानंतर महाराज रायरीकडे निघाले. चंद्ररावाने सुमारे १ महिना किल्ला झुंजविला, पण त्याचे बळ अपुरे होते. अखेर शिलिमकरांनी मध्यस्थी केली व चंद्ररावास रायरीच्या खाली उतरविले. आता रायरीचा किल्ला महाराजांच्या ताब्यात आला. महाराजांनी मोऱ्यांचा बहोत मान केला. त्यांना घोडा, शिरपावं, रुमाल दिला. महाराजांनी मोऱ्यांशी वाटाघाटी आरंभिल्या. मोऱ्यांच्या पदरी असणाऱ्या मुरारबाजी व त्यांच्या चार बंधुंना आपल्या पदरी घेतले.

महाराजांची इच्छा होती कि मोऱ्यांजवळ जुजबी शिबंदी ठेऊन त्याची जावळी परत करावी. आपले नोकर म्हणून त्यास स्थापावे. वरकरणी चंद्ररावाने महाराजांचा सल्ला मानतो असे दाखिवले पण त्याचवेळी गुप्तपणे मुधोळकर घोरपड्यांना सुटकेसाठी चोरून पत्रे लिहिली. त्याच्या दुर्दैवाने हि पत्रे महाराजांच्या हेरांच्या हाती लागली.

चंद्ररावाची हरामखोरी कळताच महाराज विलक्षण संतापले. बहुदा त्याचवेळी चंद्रराव कैदेतून निसटला पण पुन्हा पकडले जाऊन त्याला महाराजांसमोर सादर केले गेले. महाराज विलक्षण चिडलेले होते. बेईमानी केल्याबद्दल चंद्ररावाची गर्दन मारण्याचा हुकूम महाराजांनी दिला. चंद्ररावाचा मुलगा बाजी पळून गेल्यामुळे हाती सापडला नाही. पुढे हा मिर्झाराजे जयसिंगांना सामील झाल्याचे कळते. चंद्ररावाचा शिरच्छेद झाला व जावळीवरील त्यांचे आठ पिढ्यांचे राज्य संपले.

[ तळटिपः- जावळीवरील स्वारीसंदर्भात मोऱ्यांच्या बखरीत दिलेला चंद्रराव आणि शिवाजी महाराज यांच्यातला जो पत्रव्यवहार प्रसिद्ध आहे तो सर्व कपोलकल्पित आहे. अशी पत्रे देखील उपलब्ध नाहीत आणि अशा प्रकारचे संभाषण झाल्याचा उल्लेख अन्य कोठेही सापडत नाही. मोऱ्यांची बखर लिहिणाऱ्याला चंद्ररावाचे साधे व्यक्तिनाम देखील ठाऊक नव्हते, त्याला इतके बारकावे कुठून माहित असणार? तेव्हा तो सर्व त्याने कल्पनेनेच रंगविलेला आहे हे उघड आहे.

जेधे शकावलीत तिथी दिलेली नाही मात्र शिवापूर शकावलीत पुढील नोंद आहे.

"शके १५७७ मन्मथनाम संवत्सरे, पौष वद्य १४ [ १५ जानेवारी १६५६ ] : [ शिवाजीराजे यांनी ] जावळी घेतली."


चंद्ररावाने पळून जाऊन रायरीच्या किल्ल्यात आश्रय घेतला. महाराजांनी बहुधा त्याच्या पाठलागावर काही सैन्य पाठवले असेल पण ते स्वत: नंतरचे अडीच महिने जावळीस राहिले. कारण शके १५७८ च्या चैत्र शुद्ध १५ ला, म्हणजे ३० मार्च १६५६ रोजी, महाराज जावळीहून निघाले आणि चैत्र वद्य सप्तमीस, म्हणजे ६ एप्रिल १६५६ रोजी, रायरीस पोचले अशा नोंदी शिवापूर शकावलीत आहेत.

शिवकाव्यात आलेल्या वर्णनावरून, चंद्ररावाच्या उरलेल्या सर्व सैन्याचा बिमोड करण्यासाठी महाराज एवढा वेळ जावळीत थांबले होते असे दिसून येते. शिवकाव्यातील वर्णनानुसार, खासा चंद्रराव पळाल्यानंतर सुद्धा त्याच्या सैन्याने गनिमी काव्याने महाराजांच्या सैन्यावर छुपे हल्ले चालू ठेवले होते. चोऱ्या करणे, रसद तोडणे, इ. मार्गांनी त्रस्त केले होते. कपटनीतीचा अवलंब करीत एका रात्री चंद्ररावाचे सर्व सैन्य झोपेत असतांना मराठ्यांनी सर्वांना कापून काढले. दरम्यानच्या काळात महाराजांचे सैन्य रायरीला वेढा घालून बसले असेल. स्वत: महाराज ३० मार्च १६५६ रोजी जावळीतून निघाले व ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीला पोचले. त्यानंतर लवकरच चंद्रराव शरण आला. परंतु असा उल्लेख अन्य कशात आला नसल्याने हे कितपत विश्वसनीय आहे ते सांगू शकत नाही.

चंद्रराव व शिवाजी महाराज जावळीतून रायरीस कोणत्या मार्गाने गेले याविषयी कोंढवी परगण्याच्या करिन्यात व हकीगतीत आलेल्या उल्लेखांचा गरजेपुरता भाग असा:

"... नंतर खासे सिवाजी माहाराज स्वारी करून माहाबलश्वरास आले. तेथे लोकांचा जमाव करून निसणीचे मार्गे उतरून जावलीस आले. हे वर्तमान यैकोन मोरे याचे लेक व भाऊ पळून कुमठ्यास गेले. तेथून कुडपण वरून कोतवालचे सरीने उतरून कसेडीवरून सोलापशाचे खिंडीने सेडावच्या डोहावरून रायगडचे घलकीस गेले. तेथे बल धरून राहिले. त्याच्या सोधास सिवाजी माहाराज आंबानळीचे घाटे उतरून वाकणास बागराव याचे सोधास आले. तो त्ये हि पलाले ते त्येथून माहाराज बाजीर्‍यातून घलगीस जाऊन वेढा घालून भांडू लागले."

जेधे शकावलीत चंद्ररावाच्या शरणागतीची नोंद सापडते. ती पुढीलप्रमाणे:

"वैशाख मासी [ १५ एप्रिल ते १४ मे, १६५६ ] राजश्री सिवाजी राजे यांणी रायरी घेतली. समागमे कान्होजी जेधे, देशमुख, तर्फ भोर व बांदल व सिलिंबकर देशमुख व मावळचा जमाव होता. हैबतराऊ व बालाजी नाईक सिलिंबकर यांणी मध्यस्थी करून चंदरराऊ किलियाखाली उतरले."

शिवभारतातील उल्लेखानुसार, चंद्ररावाला व त्याच्या कृष्णाजी व बाजी या मुलांना महाराजांनी कैदेत ठेवले. यानंतर नेमके काय घडले याची संगतवार हकीगत कोणत्याच समकालीन साधनात दिलेली नाही. परंतु शरण आल्यावर ४-५ महिन्यात चंद्ररावाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे महाराजांनी त्याला व कृष्णाजीला ठार केले आणि बाजी मात्र वाचला याला एक पुरावा आहे. मिर्झाराजाने औरंजेबास पाठविलेले २८ किंवा २९ मार्च १६६५ चे एक पत्र उपलब्ध आहे त्यानुसार इ. स. १६६५ मध्ये बाजी चंद्रराव हा जिवंत तर होताच पण मुक्त देखील होता असे अनुमान करता येते. महाराजांनी जावळी काबीज करून कैद केल्यानंतर येसाजी चंद्रराव व त्याचा मुलगा कृष्णाजी हे जिवंत असल्याचे उल्लेख कोणत्याच साधनांत आढळत नाहीत. त्यावरून येसाजीस व त्याचा मुलगा कृष्णाजी यास महाराजांनी ठार मारले असावे असे दिसते. ] एकंदरीत मोऱ्यांची वारंवार होणारी हरामखोरी आणि बेईमानी यामुळे महाराजांनी त्यांना दंडित केले.

जावळी घेतल्यावर लवकरच चंद्रगड,मकरंदगड,चांभारगड हे किल्ले स्वराज्यात सामिल झाले. शिवाजी महाराजांचे लक्ष जावळीतल्या भोरप्याच्या डोंगरावर गेले.त्याचा 'ढोळपाळाचा डोंगर' असाही उल्लेख मिळतो (प्रतापदुर्गामहात्म्य). जावळी अभेद्य करण्यासाठी महाराजांनी भोरप्याच्या डोंगरावर किल्ला बांधायचा निश्चय केला आणि लगेच मोरोपंत पिंगळे यांना गड बांधण्यास सांगितले . गडाचे नामकरण 'प्रतापगड' असे करण्यात आले.ही जावळी ताब्यात आल्याने कोकणात उतरण्याचा मार्ग खुला झाला. आणि नव्याने बांधलेल्या याच प्रतापगडाने पुढे महाराजांचा अफझलखानासोबत घडलेला महापराक्रम पाहिला.

जावळी घेतल्यावर महाराजांनी तिथे किल्ला बांधून त्याला प्रतापगड असे नाव दिले असे मराठी बखरींमध्ये आणि इतर काही उत्तरकालीन साधनांवरून दिसून येते. याविषयी चित्रे शकावलीत एक नोंद अशी दिली आहे:

"शके १५७८ दुर्मुखी नाम संवत्सरे, [ इ. स. १६५६ - ५७ ] : सिवाजीराजे यांनी भोरपा डोंगर यास इमारतकाम येडका बुरुजाजवळ लाविले. अर्जोजी यादव, हवालदार, इमारत ऊर्फ प्रतापगड."


जावळी सुभ्यातील सालोशी या गावाविषयीच्या एका निवाड्याचा २२ डिसेंबर १६५७ सालचा एक महजर उपलब्ध आहे. त्या निवाड्याच्या वेळी हजार असलेल्या व्यक्तींची यादी महजराच्या सुरुवातीस दिली आहे. तिच्यात "गणोजी गोविंद, हवालदार, किल्ले प्रतापगड" असे एक नाव आहे. याचाच अर्थ, २२ डिसेंबर १६५७ च्या आधी किल्ल्याला प्रतापगड हे नाव दिलेले होते व तिथे हवालदाराची देखील नेमणूक केली होती.


चंद्रराव मोर्यांशी झालेल्या संघर्षाची कारणे :-

१) स्वराज्याच्या प्रयत्नात सर्वांचेच सहकार्य आवश्यक होते आणि त्याकरिता जहागीरदार मध्ये युती निर्माण करण्याचे प्रयत्न शिवरायांनी चालविले होते.त्यानुसार मावळ प्रांतत युती घडून आलेली होती. परंतु निरा आणि कृष्णा या प्रदेशातील जहागिरदार यांत एकजूट होऊ नये असेच प्रयत्न चंद्रराव मोरे याने चालविले होते. यांतून शिवाजी राजे व मोरे यांच्यात संघर्ष निर्माण झाला.

२) शिवाजी महाराजांच्या जहागिरीतून पळून आलेल्या अनेक गुन्हेगारांना चंद्रराव मोरे याने आपल्या जहागिरीत उघडपणे आश्रय दिला. चंद्ररावाची ही आगळीक शिवाजी राजे सहन करणे शक्य नव्हते.

३) शिवरायांना ताबडतोब मोगलांवर किंवा आदिलशहावर हल्ला चढवायचे नव्हता,तरी पुढेमागे असा संघर्ष होणारच याबत त्यांना खात्री होती. तसे झाल्यास जावळीच्या प्रदेशाचा उत्तम उपयोग करून घेण्यासारखा होता. त्याठिकाणी लष्करी तळ स्थापन करणे अत्यंत सोपे होते.

४) जावळी जिंकून घेण्याकरिता दक्षिणेतील राजकीय स्थिती सुद्धा अनुकूल होती.मोहम्मद अदिलंशहा हा मृत्यूशय्येवर पडला होता आणि त्याच्या दरबारात विविध कारस्थानांना नुसता ऊत आलेला होता वाई प्रांताचा सामर्थ्यशाली सुभेदार अफजलखान हा देखील नुकताच कर्नाटकाच्या स्वारीवर गेलेला होता. दक्षिणेतील सुभ्यावार राजपुत्र औरंगजेब यांची सुभेदार म्हणून नुकतीच नेमणूक झालेली होती.तो जावळीच्या स्वारी विषयी उदासीन होता शिवाजीं राजांनी या सर्व राजकीय परिस्थितीचा जावळी येथील स्वरीकरिता उपयोग करून घेतला.

४) चंद्रराव मोरे यांचा पाडाव करण्याची सर्वांत प्रमुख कारण म्हणजे तो शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाच्या आड येत होता हे होय. जे जे मराठी जागीरदार स्वराज्यस्थापनेच्या आड येतील त्यांना वठणीवर आणायचे हे शिवाजीने ठरवून ठेवले होते. या पार्श्वभूमीवर सभासद बखरीमध्ये "चंद्रराव मोरे यास मारल्याविरहित राज्य साधत नाही" हे शिवाजीराजांच्या तोंडचे वाक्य अतिशय अर्थपूर्ण आहे, असे समजले पाहिजे. स्वराज्य स्थापन करण्याकरिता जावळी घेणे अत्यंत आवश्यक होते हेच यावरून दिसून येते.

५) दौलतराव मोरे यांच्या मृत्यू झाल्यानंतर चंद्रराव किताब आपल्याला मिळावा म्हणून मोरे घराण्यातील अनेकांनी प्रयत्न चालविले होते. परंतु दौलतरावाच्या पत्नीला मोरे घराण्यातील खरा वारस यशवंतराव यालाच वारस म्हणून निवडायची होते. तिने शिवाजी राजाना मदतीची विनंती केली आणि त्यामुळे यशवंतरावांना वारसाहक्क मिळू शकला. शिवाजी महाराजांचा हा उपकार न जाणता यशवंतराव आणि त्याचा कारभारी हनुमंतराव हे दोघेही अफजलखानाला जाऊन मिळाले आणि शिवाजी राजांविरुद्ध नाना प्रकारची कारस्थाने करू लागली. या विश्वासघाताचा सूड म्हणून शिवाजी राजांनी जावळीवर स्वारी करण्याचा निश्चय केला.

६) शिवाजी राजांचा बंदोबस्त करण्याकरता म्हणून आदिलशाही दरबाराने शामराज या सरदारास प्रचंड फौज घेऊन पाठविले. त्यावेळी त्याला चंद्रराव मोरे याने सर्व प्रकारे सहाय्य केले. पलीकडे अचानक हल्ला चढवून शिवाजी महाराजांनी जरी श्यामराजचा पराभव केला तरी चंद्रराव मोरे यांच्या विश्वासघाती पणा शिवाजी राजे कधीच विसरला नाहीत आणि म्हणूनच शिवाजी राजांनी जावळी जिंकण्याचा दृढनिश्चय केला.


जावळी मोहिमेचा आढावा

शिवरायांनी जावळी घेण्याचा अतिशय धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येते. जावळी घेतल्यावर त्यांना कोकणातली थेट वाट प्राप्त झाली. त्याच्या छोट्या सैन्याला व वेगवान हलचालींना अनुकूल आणि आदिलशाही व मुघलांसारख्या भल्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना प्रतिकूल असा मोठा प्रदेश त्यांना मिळाला. त्यांनी लगेच भोरप्या डोंगरावर प्रतापगड बांधायला घेतला. फक्त तीन वर्षांनी त्याच ठिकाणी राजे अफजलवध करणार होते .

जावळी जिंकल्यावर लगेच प्रभावळीच्या सूर्यराव सुर्व्यांनी कोकणात शिवरायांची सत्ता मान्य केली. ह्यामुळे शिवरायांचा मुलुख आणखी वाढला. जंजीरेकर सिद्दीही आता शिवरायांचा शेजारी झाला. शिवरायांनी रायरीही जिंकला होता त्याचाच पुढे रायगड झाला, मराठा साम्राज्याची राजधानी. ह्या एका चालीने राजांना पुणे व आसपासच्या परिसराहून कितीतरी मोठ्या प्रदेशाचा मानकरी केले. ह्या चालीनंतर राजांना त्याच्या शेजाऱ्यांकडूनही मान मिळायला लागला.

याशिवाय अजून एक फायदा असा होता की कोकणातील दाभोळ बंदरातुन जो माल विजापुरला जाई तो पारघाटाने वा हातलोट घाटाने जावळीमार्गे जात असे. त्यामुळे एकतर या मालावरची जकात आता महाराजांना मिळणार होती आणि दुसरं असं कि विजापूरला आर्थिकदृष्ट्या जखडून टाकण्याचा तो एक डाव असावा. त्यामुळे बाहेरच्या देशांशी विजापुरचा जो व्यापार दाभोळ बंदरातून चाले त्यावर काही प्रमाणात नियंत्रण हे महाराज ठेवू शकत होते.

जावळीतून रायरी व प्रतापगडाबरोबर त्यांना वासोटा किल्लाही मिळाला जो आजही अतिशय दाट व भयंकर अरण्यात लपलेला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिवरायांना प्रथमच मोठा समुद्रकिनारा लाभला. त्यामुळे आरमारावर लक्ष देणे त्याला अनिवार्य होते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जावळी जिंकणे हे त्याच्यासाठी फार मोठे पाऊल होते. राजाच्या छोट्या जाहगीरीला ह्यामुळे छोट्या राज्याचे स्वरुप मिळाले.


जावळी मोहिमेचे महत्व

सन १६५६ मधे मुघलांनी कुतुबशाहीवर आक्रमण केले होते. ह्या वादळाचे लोट त्यांच्या प्रदेशात येऊ नयेत म्हणून आदिलशाहीनेही त्यांचे सैन्य कुतुबशाही सीमेवर ठेवले होते. हा भाग जावळीपासून कित्येक दूर होता. त्यामुळे मुघल किंवा आदिलशाहीला जावळीतल्या घडामोडींकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता. तसेच शिवरायांना मोरे व आदिलशाहीमधे उडालेल्या खटक्यांची माहिती होती. त्यामुळे तशी वेळ आली असती तर जावळीवरचे त्यांचे आक्रमण आदिलशाहीसाठीच केले होते असे कारणही राजे पुढे करु शकत होते .

शिवरायांनी ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन जावळीवर आक्रमण केले असे ठामपणे सांगता येत नाही पण निश्चितपणे ती वेळ सुयोग्य होती. जावळीवरचे आक्रमण सुरु करण्यापूर्वी शिवरायांनी संभाजी कावजीला हणमंतरावाकडे असलेल्या जोर खोऱ्यावर चालून जायला सांगितले होते. त्यामुळे तिथुन शिवरायांवर वार होणार नाही ह्याची त्यांनी आधीच काळजी घेतली होती. ह्यातून अचूक योजना करण्याचे व ती पार पाडण्याचे शिवरायांचे कौशल्य आपल्याला दिसते.




तळटीपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार

संदर्भग्रंथः-

१) जेधे शकावली

२) प्रतापगडदुर्गामहात्म्य

३) शि.च.सा.ख.-१०-पृ-५४

४) शाहू दफ्तर

५) स्वराज्याची सनद

६) मोरे बखर (ऐतिहासिक बखरी)- संपादक : अविनाश सोवनी

७) परमानंदकृत शिवभारत - संपादक : स.म.दिवेकर

८) प्रतापगडदुर्गमहात्म्य - संपादक : सदाशिव शिवदे

९) श्री राजा शिवछत्रपती - गजानन भास्कर मेहेंदळे

१०) शककर्ते शिवराय - विजय देशमुख

११) श्री राजा शिवछत्रपती खंड १- बाबासाहेब पुरंदरे

१२ ) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

१३) फार्सी-मराठी कोश - प्रा. माधव त्रिंबक पटवर्धन

१४) सातारा जिल्हा गॅझेटीयर

१५) पुणे जिल्हा गॅझेटीयर

१६) श्री रोहित पवार, अनुप बोकील, दिलीप वाटवे, समीर पटेल, श्रीकांत लव्हटे यांचे लेखन

१७) http://gadkot.in हा ब्लॉग

१८) https://rajeshivchhatrapati.wordpress.com हा ब्लॉग


Facebook Twitter Pinterest WhatsApp Reddit

Log in or register to post comments

12857 वाचने

प्रतिक्रिया


अभ्यासपुर्ण माहिती आणी

28 Aug 2020 - 9:33 pm | सिरुसेरि

अभ्यासपुर्ण माहिती आणी अप्रतिम फोटो . +१००


Log in or register to post comments


अफाट लेख.

31 Aug 2020 - 10:44 am | प्रचेतस

अफाट लेख.

विस्तार आणि आवाका समजून घ्यायला पुन्हा वाचावा लागणार आहेच.


Log in or register to post comments


जावळी

1 Sep 2020 - 6:49 am | जयन्त बा शिम्पि

माहितीचे संकलन उत्तम आहेच्,पण लेख बारकाइने वाचावा लागेल, वाचनखूण त्यासाठी साठविली आहेच. पुलेशु.


Log in or register to post comments


सुंदर

2 Sep 2020 - 11:29 am | निनाद

सुंदर झाला आहे लेख. अगदी परत परत वाचला तरी मन भरत नाही.


Log in or register to post comments


फारच सुंदर लेख...

2 Sep 2020 - 1:58 pm | बेकार तरुण

फारच सुंदर लेख...


Log in or register to post comments


अप्रतिम ऐतिहासिक माहिती..

5 Sep 2020 - 12:07 pm | गणेशा

अप्रतिम ऐतिहासिक माहिती..

इतके संदर्भ वाचून लिहिणे अवघड काम आहे...


__^__


Log in or register to post comments


माहितीपूर्ण लेख

7 Sep 2020 - 6:13 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,


अतिशय माहितीपूर्ण लेख आहे. धन्यवाद! :-)


एक शंका आहे. कृपया या वाक्याच्या वरील नकाशा पहा :


यानंतर शिवाजीराजे पुरंदरवरून जावळीवर आक्रमणार्थ दहा हजारांची फौज घेऊन निघाले


या नकाशात जावळी गाव हे प्रतापगड व निसणीचा घाट यांच्या मध्यावर दाखवले आहे. गूगल नकाशावर मात्र जावळी गाव जरा उत्तरेला दिसते. तर आजच्या गूगल नकाशावर पाहता निसणीचा घाट ही वाट दरे गावावर न उतरता लॉडविक पॉईंट वरून उतरणारी धार वाटते. या वाटेस लागूनच elephant's head नावाचा एक स्थानही दिसंत आहे. फोटोतला खडक पाहिल्यावर हत्तीचं गंडस्थळ ही उपमा यथार्थ वाटते.


तर सांगायचा मुद्दा असा की आजच्या गूगल नकाशाप्रमाणे महाराज जर लॉडविक पॉईंट वरून जावळी गावात उतरले असतील तर मग लेखातल्या उपरोक्त नकाशात प्रतापगडाचं स्थान निश्चितंच चुकलं आहे.


आ.न.,

-गा.पै.


Log in or register to post comments


प्रतिसादासाठी धन्यवाद !

9 Sep 2020 - 1:55 pm | दुर्गविहारी

प्रतिसादासाठी धन्यवाद !


आजच्या गूगल नकाशावर पाहता निसणीचा घाट ही वाट दरे गावावर न उतरता लॉडविक पॉईंट वरून उतरणारी धार वाटते. या वाटेस लागूनच elephant's head नावाचा एक स्थानही दिसंत आहे. फोटोतला खडक पाहिल्यावर हत्तीचं गंडस्थळ ही उपमा यथार्थ वाटते.


लॅडविक पॉईंटवरुन थेट दरे गावात एक वाट खाली उतरते.गेल्यावर्षी महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा, लॅडविक पॉईंटवर स्ट्रॉबेरी विकायला आलेली व्यक्ती हिच वाट चढून वर आलेली होती. त्याने ती वाट मला दाखवली.अर्थात निसणीचा घाट हा नव्हे. तुम्हाला त्याची माहिती दिलेल्या ब्लॉगची लिंक देतो.

रडतोंडी, निसणी - जावळी खोरयातील ऐतिहासिक वाटा!


हि निसणीची वाट दरे गावाच्या काहीशी उत्तरेला आहे.


Log in or register to post comments


लैच्च गोंधळ उडाला ...

9 Sep 2020 - 3:26 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,


लैच्च गोंधळ उडाला राव. त्यावर मात करण्यासाठी एकंच उपाय दिसतो.


या नकाशात दरे गाव कुठं आहे? :




https://3.bp.blogspot.com/-khz0-UOid0k/VRUinK1TBdI/AAAAAAAAB3k/k4G6Dzyki...


आ.न.,

-गा.पै.


Log in or register to post comments


हा नकाशा उपयोगी पडतो का बघा

12 Sep 2020 - 9:32 pm | दुर्गविहारी



हा नकाशा उपयोगी पडतो का बघा


Log in or register to post comments


होय

13 Sep 2020 - 9:30 am | स्वच्छंदी_मनोज

होय,


लॉडवीक पॉइंटवरून एक वाट नक्कीच खाली उतरते पण ती दरे गावात नाही तर दरे गावाच्या अगोदर असलेल्या जावळी नावाच्या गावातच उतरते.

ह्या वाटेने मी ट्रेक केलेला आहे. वाटेत एका नैसर्गीक रीत्या बनलेल्या गुहेत गावकर्‍यांनी जननी देवीची मुर्तीही बसवलेली आहे..


ह्याच दरे गावाच्या अलीकडे जावळी नावाचे गावही आहे. तीन वाड्याही आहेत. वरची जावळी, मोर्‍यांची जावळी आणी मधली जावळी. ह्या तिनांपैकी मोर्‍यांच्या जावळी वाडीत एका वाड्याच्या जोत्याचे अवशेष आहेत. स्थानीक लोक त्याला मोर्‍यांचा वाडा म्हणून ओळखतात.


दरे गावात महाबळेश्वर हुन दोन वाटा उतरतात. तसेही दरे गावाचे लोकेशन अगदी अंतर्भागात आहेच. एक वाट जुनी आणी एक हल्लीची. जुनी जी वाट आहे ती क्षेत्र महाबळेश्वरहुन येते जी काही ठीकाणी पायर्‍या असलेली वाट आहे आणी एका ठीकाणी वाटेत गणपती आणी हनुमान मुर्ती कोरलेली आहे. दुसरी जी वाट आहे जी दरे गावातून सरळ नवीन महाबळेश्वर बाजारपेठ (बस स्थानक) येते जाते.

ह्या दोन्ही वाटा मी ट्रेक करून बघीतलेल्या आहेत त्यामुळे सांगू शकतो की नि:शंशय जुनी वाटच शिवकालीन आहे आणी तीच वापरात होती..


Log in or register to post comments


स्वच्छंदी_मनोज,

13 Sep 2020 - 9:58 pm | गामा पैलवान

स्वच्छंदी_मनोज,


बरे सापडलांत! :-)


तर मग वर दिलेल्या या इथल्या नकाशात निसणीची वाट दाखवली आहे ती बरोबर आहे का? तुम्हांस दुजोरा देता येईल काय? ही वाट बहुधा वरच्या जावळीवाडीत उतरंत असावी.


धन्यवाद!


आ.न.,

-गा.पै.


Log in or register to post comments


होय

14 Sep 2020 - 7:20 pm | स्वच्छंदी_मनोज

होय. हीच ती वाट.

क्षेत्र महाबळेश्वराहुन ही वाट सुरु होते ती मोठ्या जंगल रस्त्याने (हा साधारण ४ किमी चा मार्ग अत्यंत भन्नाट आहे.. सरळ सोट, अगदी जंगलातून जातो. हा रस्ता ब्रिटीशकालीन आहे आणी क्षेत्रमहाबळेश्वर ते सावीत्री पॉईंट ते आर्थर सीट पॉईंट जाणार्‍या डांबरी सडकेला समांतर आहे पण अगदी जंगलात असल्याने चटकन लक्षात येत नाही.

पुढे ही वाट दावीकडे वळून उताराला लागते आणी थोडेसे खाली उतरून खालच्या टप्प्यावर आलो की एका पठारावरून पुढे जाते. पुढे मग अजुन उतरून एका टोकावर येते जिथून आपल्याला समोर लॉडवीक पाईंट, तळाशी दरे गाव, त्यापुढे जावळी गावाच्या वाड्या लागतात. मग वाट तशीच पुढे खाली उतरते. मधे काही ठीकाणी कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत (याच मुळे या पायवाटेला निसणीची वाट म्हणतात) तिथेच दोन ठीकाणी हनुमान आणी गणेशाची मुर्तीही कोरलेली आहे. एका ठीकाणी बुजलेले पाण्याचे टाके ही आहे. अशीच वाट खाली उतरत गेलो तर आपण अगदी दरे गावाच्या शिवारात उतरतो.

आम्ही हीच वाट चढून गेलेलो तेव्हा आम्हाला साधारण २.५ तास लागलेले दरे ते क्षेत्र महाबळेश्वर जायला. पण हीच वाट वरून उतरायची म्हटली तर थोडेसे पझलिंग आहे कारन महाबळेश्वरच्या जंगलात उताराला लागणारी बरोब्बर वाट चटकन सापडत नाही..


Log in or register to post comments


आलं लक्षात!

14 Sep 2020 - 8:44 pm | गामा पैलवान

स्वच्छंदी_मनोज,


आलं लक्षात. माहितीबद्दल धन्यवाद! :-) गूगल म्याप्स वर दरे गावाची जागा पार चुकलीये.


बरं, आता तुमच्यासाठी आजून एक प्रश्न. श्रीक्षेत्र महाबळेश्वराहून दरे गावात उतरणाऱ्या दोन्ही वाटा तुम्ही केल्या आहेत. मग अफझुल्याच्या मयतीनंतर त्याचा पोरगा फाझल जी वाट चढून पळाला ती निसणीची होती का दुसरी? तो जावळीत होता, तिथे त्याचा बाप मेल्याची बातमी आली. मग त्यानं तिथनं पळ काढला. घोडे व लवाजमा घेऊन चढून जायच्या सोयीची वाट कोणती?


आ.न.,

-गा.पै.


Log in or register to post comments


जर

15 Sep 2020 - 6:16 pm | स्वच्छंदी_मनोज

गूगल म्याप्स वर दरे गावाची जागा काय दाखवलीय मला माहीत नाही. पण पोलादपुर - महाबळेश्वर रस्त्यावर वाडा-कुंभरोशीच्या पुढे साधारण तिनेक किमीला जावळी फाटा आहे त्या फाट्यावरून डावीकडे आत गेल्यावर चार किमीवर दरे गाव आहे. दरे गावापस रस्ता येऊन संपतो कारण पुढे महाबळेश्वरची डोंगर भिंत आहे.


माझा इतीहासाबद्दल फार काही अभ्यास नाही पण जर फाजलखान महाबळेश्वर सोडून खाली उतरला असेल तर त्याला परत वर पळायला त्याकाळी दोनच वाटा वापरात होत्या एक वर उल्लेखलेली निसणीची वाट आणी दुसरी रडतोंडीची घाटवाट.

या दोन्ही वाटा पुढे वाईलाच जातात. रडतोंडीचा घाट (ही पण घाटवाट मी ट्रेक केली आहे) अगदी प्रतापगड पायथ्याच्या पार गावातून वरती नवीन महाबळेश्वरापाशी जातो (सध्याच्या बाँबे पॉईटपाशी) मग पुढे तिथून पसरणी घाटाने उतरून वाईत जाता येते. तर निसणी घाटाने वर क्षेत्रमहाबळेश्वरापास वर चढल्यास तिथून खाली परत जोर गावात उतरून कमळगड, मेणवली करत वाईला जाता येते.

या पैकी कुठल्याही वाटेने तो परत वाईला पळाला असू शकेल.


माझ्या ट्रेकिंग मधे जावळी-महाबळेश्वर, किंवा रायगड, सुधागड भागाला अत्यंत्य खास स्थान आहे म्हणूनच या भागात चिक्कार भटकंती केलीय :) :)


Log in or register to post comments


धन्यवाद!

16 Sep 2020 - 1:14 am | गामा पैलवान

स्वच्छंदी_मनोज,


माहितीबद्दल धन्यवाद!


दरे गावात जाऊन संपणारा रस्ता गूगलम्याप्स वर सापडला. तोच रस्ता पुढे निसणीची वाट बनतो (असं दिसतंय).


माझ्या मते फाजलखानास निसणीची वाट आजिबात झेपणारी नव्हती. तो रडतोंडीच्या घाटाने पळाला असणार.


जावळी-महाबळेश्वर, सुधागड, रायगड हा भाग माझ्याही जिव्हाळ्याचा आहे! :-)


आ.न.,

-गा.पै.


Log in or register to post comments


बहुधा लॉडविकच्या वाटेने

28 Jan 2021 - 4:29 pm | दिलीप वाटवे

या संदर्भात माझे निरीक्षण/तर्क सांगतो...


निसणीने फाजलखान जाणार नाही कारण एकतर ती वाट अवघड आहे आणि दुसरे असे की क्षेत्र महाबळेश्वरहून पुढे वाईला जाण्यासाठी त्याला शेवटी जोरखोऱ्यातूनच जावे लागेल. जोरखोऱ्यात नेतोजी ससैन्य असल्याची बातमी हेरांकडून नक्कीच त्याला कळली होती. ते सैन्य प्रतागडाच्या मदतीला आले तर अडसर व्हावा म्हणून अफजलखानाने एक तुकडी दुधोशी/हारोशीला ठेवली होती त्यामुळे 'निसणी' नक्कीच नाही.


दऱ्यातून नवीन महाबळेश्वरला चढणारी वाट नवीन आहे. ती शिवकालीन नाही. पारसनीसांनी त्यांच्या 'महाबळेश्वर' पुस्तकात या वाटेचा उल्लेख केलेला नाही.


रडतोंडीच्या घाटानेच अफजलखान पारला आला होता त्यामुळे त्या वाटेने अफजलखानाचे सैन्य त्याच्या वाईच्या मुख्य तळावर जाईल ही शक्यता गृहीत धरून महाराजांनी बाबाजी भोसले आणि तान्हाजी मालुसरेंना रडतोंडीच्या घाटावर ससैन्य ठेवले होते त्यामुळे रडतोंडीही नाही.


राहिला शेवटचा पर्याय तो म्हणजे लॉडविकची वाट. बहुतेक सर्व ऐतिहासिक साधनांत 'पारचे लष्कर बुडविले' असा संदर्भ मिळतो त्यामुळे दुधोशी/हारोशीच्या सैन्यावर हल्ला झाला नसावा आणि याच सैन्याच्या आणि obviously मोऱ्यांच्या मदतीने फाजलखान वाईला गेला असावा.


हवे असल्यास याचे सगळे संदर्भ मी देऊ शकतो. फाजलखान नेमक्या कोणत्या वाटेने वाईला गेला हे कुठल्याही ऐतिहासिक साधनांत आलेले नाही त्यामुळे आपण केवळ तर्कच करू शकतो.


Log in or register to post comments


फाझलखानचा मार्ग

30 Jan 2021 - 4:03 pm | गामा पैलवान

दिलीप वाटवे,


तुमचं निरीक्षण व तर्क मांडल्याबद्दल आभार. तुमच्या परिश्रमांविषयी आदर व कौतुक आहे.


लॉडविकच्या वाटेस मी चुकून निसणीची वात समजून चाललो होतो. परंतु ही वेगळी आहे हे नंतर लक्षांत आलं. ही वाट निसणीइतकी चढी नाही. माझ्या माहितीप्रमाणे आजही लॉडविक पॉईंट वरून लोकं कोयनेच्या खोऱ्यात उतरू शकतात. लॉडविक ट्रेल म्हणून आज गूगल नकाशावर जी वाट दाखवतात ती हत्तीपाषाणास ( एलेफंट पॉईंट ) संपते. पुढे तुटका कडा नसून खाली उतरण्याजोगी जागा दिसतेय. त्यामुळे तुमचा तर्क अधिक उचित वाटतो.


ही वाट जुनी असून प्रतापराव मोऱ्याने आडवाट म्हणून हाच मार्ग दाखवलेला दिसतो.


आ.न.,

-गा.पै.


Log in or register to post comments


जबरदस्त!!

7 Sep 2020 - 6:52 pm | तुषार काळभोर

अतिशय माहितीपूर्ण लेख!

बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा कळल्या.


Log in or register to post comments


मस्त

13 Sep 2020 - 9:44 am | स्वच्छंदी_मनोज

Log in or register to post comments


मस्त

13 Sep 2020 - 9:44 am | स्वच्छंदी_मनोज

Log in or register to post comments


मस्त

13 Sep 2020 - 9:45 am | स्वच्छंदी_मनोज

दुर्गविहारीजी,


उत्तम माहीती संकलन आणी लेखन. घेतलेले कष्ट जाणवताहेत.

हा भाग विषेश करुन माझ्या खास आवडीचा आहे आणी गेल्या काही वर्षात या भागात कित्येक ट्रेक्स देखील केल्यामुळे भौगोलीक परीचय देखील झालेला आहे.


तुम्ही दिलेल्या घाटवाटांपैकी बर्‍याच घाटवाटांचा ट्रेक मी केलेला आहे त्यामुळे भौगोलीक स्थानमहात्म्य आणी दुर्गमता अनुभवलेली आहे. किल्ल्यांच्या यादीतील बरेचसे किल्ले देखील बघीतलेले आहेतच. कुंभरोशी जवळाच्या जावळी गावातील मोर्‍यांचा वाडा, शिवथर घळीजवळील चेरावडी गावाजवळचाचा मोर्‍यांचा वाडा आणी ऐन जावळी गाभ्यातला उचाटचा निरपजी मंदीराजवळचा मोर्‍यांचा वाडा हे तिनही जागा मी बघीतलेल्या असल्याने जावळी काय चीज असू शकेल याचा अंदाज नक्कीच आहे. तुम्ही जो वरती फोटोत स्मृतीस्तंभ दिलाय तो निरपजी देवराई देवळाजवळचाच ..


माझे असे ठाम मत आहे की स्वराज्य स्थापनेची सर्वोत्तम संधी जावळीच्या मोर्यांना होती....कारण...

१. हातात भला मोठा प्रदेश

२. निरंकुश सत्ता

३. परकिय आक्रमणाचा धोका नाही किंवा अत्यल्प

४. विश्वासू आणि कडवे सरदार आणी सैन्य

५. राजांकित प्रजा

६. सम्रुद्ध आर्थिक स्थिती

७. ताब्यात बंदरे आणि परदेशी आर्थिक व्यापार


असे सर्व असताना फक्त स्वधर्म आणि स्वराज्य याची मनात आकांक्षा नसणे या कारणांमुळे मोरे कायम दुसर्‍यांच्या छत्राखाली राहीले..

म्हणूनच राजांचे महत्त्व मोठे. आपण स्वतः किती ताकदवान आहोत त्यापेक्षा किती ताकदवान शत्रूचा पराभव केला त्यावरून मोठेपण ठरले पाहीजे असे मला वाटते.

राजांनी दासगावच्या "आऊचा काऊ तो माझा भाऊ" ह्या नात्याने एका मोर्‍याला जहागिरी दिली हा मास्टरस्ट्रोक होता..


(हा मोरे नंतर फिरला तो भाग वेगळा :) :) :) )


आजही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जावळीत ट्रेक करायला, किल्ले बघायला. जंगल भटकायला आणी घाटवाटा करायला मला आवडतेच....


Log in or register to post comments


एक नंबर प्रतिसाद मनोज.

13 Sep 2020 - 10:09 am | कानडाऊ योगेशु

एक नंबर प्रतिसाद मनोज.

दुगविहारींच्या लेखातील जावळीचे व मोर्यांचे वर्णन वाचुन असेच वाटले होते कि मोर्यांना खरेतर स्वतःचे राज्य निर्माण करायची संधी होती पण त्यांनी ती गमावली.

ह्या पार्श्वभूमीवर संगणक क्षेत्रातील सुरवातीची स्थित्यंतरे नजरेखालुन घातली तर असे दिसते कि बिल गेट्स बनण्याची संधी बर्याच जणांना होती पण त्यांनी ती आपल्या अहंकारापायी वा दूरदृष्टीतेच्या अभावापायी गमावली. आजच्या काळातल्या टर्मिनोलॉजी नुसार शिवाजीराजे हे एक उत्कॄष्ठ एंतरप्रेनर ठरतात.


Log in or register to post comments


सैन्यबळापेक्षा आवश्यक असते ते व्हिजन

15 Sep 2020 - 11:56 am | दुर्गविहारी

यासगळ्यासाठी सैन्यबळापेक्षा आवश्यक असते ते व्हिजन. मुळात ते नसेल तर बाकीच्या रिसोर्सना अर्थ उरत नाही.हेच व्हिजन छत्रसाल बुंदेला यांच्याकडे होते,राणाप्रताप्,बडफुकन यांच्याकडे होते,त्यांनी केलेले प्रयत्न आपल्या डोळ्यासमोर आहेत.

मुळात मोर्‍यांना महाराजांनी पुरेशी संधी दिली होती.आधी पत्र पाठवून ,मग रायगडाखाली अटक केल्यानंतर पुढे तीन महीने कैदेत ठेवले होते.मात्र तरीही मुधोळच्या घोरपड्यांशी संधान साधून मोर्‍यांनी आदिलशाहीला संपर्क करायचा प्रयत्न केला.हि केवळ गुलामगिरीची मानसिकता होती.मोरे धोकादायक होत आहेत हे पाहूनच शिवाजी महाराजांनी मोरेंना मारुन टाकले.ईतकी गुलामगिरी रक्तात भिनलेले हे सरदार स्वराज्य स्थापनेचा विचार करतील हे अशक्य होते.


Log in or register to post comments


जबरदस्त!

13 Sep 2020 - 9:53 am | चलत मुसाफिर

किती अभ्यासपूर्ण लेख! वा!


एक जंगी पदभ्रमण मोहीम काढण्याचा अनावर मोह होत आहे.


Log in or register to post comments


अतिशय सुंदर व मनोहर लेख

14 Sep 2020 - 8:37 pm | धर्मराजमुटके

अतिशय सुंदर व मनोहर लेख. शिवचरीत्र कितीही वेळा वाचा, ते पुन्हा पुन्हा नवीन आणि वाचत रहावे असेच वाटते. तुमचा लेखही अतिशय अभ्यासपुर्ण आणि मेहनत घेऊन लिहिलेला आहे हे पदोपदी जाणवते.

दोन प्रश्न विचारतो.

१. मराठा इतिहासात बरीचशी नावे वारंवार आढळतात. मात्र शोदाजी हे नाव मी इतक्या वर्षात प्रथमच वाचले. या नावाचा मुळ प्रेरणास्त्रोत किंवा नावाचा अर्थ काय यावर काही प्रकाश टाकता येईल काय ?

२. मुरारबाजी देशपांडे शत्रुपक्षात होते व नंतर महाराजांच्या केवळ चाकरीतच राहिले नाही तर मर्जीत देखील राहिले. राजांची माणसे ओळखण्याची कला वाखाणण्याजोगीच होती यात वादच नाही मात्र महाराज आणि त्यांच्या सबंधांवर थोडेसे अजून लिहिले असते तर अजून मजा आली असती असे वाटते. मुळ लेखाचा उद्देश जावळीचा परीचय करुन देणे आहे हे मान्य आहे.


Log in or register to post comments


प्रतिसादाबध्दल धन्यवाद !

15 Sep 2020 - 11:50 am | दुर्गविहारी

प्रतिसादाबध्दल धन्यवाद ! चंद्रराव मोर्‍यांची बखर यामध्ये मी वाचलेले संदर्भ वर आहेत.मात्र शोदाजी या मोरे घराण्यातील पुरुषाविषयी अधिक काही सांगणे कठिण आहे.कारण मोरे घराण्याचे वंशज सध्या विखुरले आहेत शिवाय बर्‍याच जणांनी मोरे हे आडनाव टाकून ज्या गावात रहातात, त्याचे नाव घेतले आहे.तेव्हा अधिक काही कागदपत्रे उपलब्ध झाली तरच यावर प्रकाश टाकणे शक्य आहे.


मुरारबाजी देशपांडे शत्रुपक्षात होते व नंतर महाराजांच्या केवळ चाकरीतच राहिले नाही तर मर्जीत देखील राहिले. राजांची माणसे ओळखण्याची कला वाखाणण्याजोगीच होती यात वादच नाही मात्र महाराज आणि त्यांच्या सबंधांवर थोडेसे अजून लिहिले असते तर अजून मजा आली असती असे वाटते. मुळ लेखाचा उद्देश जावळीचा परीचय करुन देणे आहे हे मान्य आहे.


मुळात मुरारबाजी काय किंवा बाजीप्रभु देशपांडे काय,दोघेही शत्रुपक्षाकडून महाराजांविरुध्द लढले.त्यांचे गुण जाणून महाराजांनी त्यांना आपल्या बाजुला वळवून घेतले आणि महत्वाचे म्हणजे यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता स्वराज्यासाठी देह ठेवला.अर्थात हेच असंख्य मावळ्यांनी केले.याचे अर्थात महत्वाचे कारण नेत्यावरचा विश्वास. आपला नेता प्रामाणीकपणे एका कार्यासाठी स्वताच्या जीवाची पर्वा न करता आपल्या रयतेसाठी झीजतो आहे हे उदाहरण शिवाजी महाराजांच्या धडपडीतून त्यांच्या सर्व सरदारांसमोर होते.शिवाय प्रसंगी शिवाजी महाराज स्वताच्या जीवाची पर्वाही करत नाहीत्,हे अनेक प्रसंगातून त्यांना दिसले.मग ती अफझलखानाची भेट असो,शाहीस्तेखानावर केलेला सर्जिकल स्ट्राईक असो किंवा राज्याभिषेक एन तोंडावर आलेला असताना मार्च १६७४ मध्ये वाईजवळचा केंजळगड घेण्यासाठी स्वता महाराजांनी केलेली स्वारी असो.शिवाजी राजांनी स्वता नेतृत्व करुन्,प्रसंगी प्राण धोक्यात घालून उदाहरण घालून दिले म्हणून त्यांच्यासाठी प्राण देताना कोणत्याही मावळ्याने साधा विचार केलेला दिसत नाहीत.शिवाय आपल्यामागे आपल्या कुटूंबाला व्यवस्थित सांभाळले जाईल हि खात्री होतीच.


Log in or register to post comments


अफलातुन लेख !

15 Sep 2020 - 12:41 pm | मार्कस ऑरेलियस

अफलातुन लेख !


हे सर्व प्रत्यक्श फिरुन पहायला काय मजा येईल, सगळ्या घाटवाटा पायाखालुन घालायला हव्यात एकदा , सगळे गडकिल्ले स्वतः पहायला हवेत !


.... कॉलिंग किसन शिंदे !


Log in or register to post comments


एक नंबर !

16 Sep 2020 - 5:24 pm | चौथा कोनाडा

👌


एक नंबर अफलातून लेखन !

उदबोधक नकाशे आणि सुंदर प्रची !

जावळीच्या खोर्‍यात हरवायला झाले !


🙏

दुर्गविहारी _/\_


Log in or register to post comments


खूपच अभ्यासपूर्ण लेखन. खूप

25 Dec 2020 - 7:57 pm | सोनु मोरे

खूपच अभ्यासपूर्ण लेखन. खूप धन्यवाद.


Log in or register to post comments


अफाट आणि जबरदस्त!

26 Dec 2020 - 8:02 am | सोत्रि

अफाट आणि जबरदस्त!


- (इतिहासप्रेमी) सोकाजी


Log in or register to post comments


'रेफरन्स' म्हणून माझे नांव टाकणे कितपत योग्य आहे..?

28 Jan 2021 - 3:41 pm | दिलीप वाटवे

माझ्या लेखातले बरेचसे लिखाण तुम्ही जसेच्या तसे copy paste केले आहे. अगदी मी दिलेले रेफरन्स नंबरही जसेच्या तसे घेतलेले आहे. संदर्भ सुचीदेखील तीच आहे. असे दुसऱ्याने लिहिलेल्या लेखातला भाग जसाच्या तसा स्वतःच्या लेखात लिहिण्याला तुमच्या लेखी 'रेफरन्स' म्हणतात काय?


Log in or register to post comments


तुमच्या

28 Jan 2021 - 4:02 pm | प्रसाद_१९८२

लिखाणाची इथे लिंक देता येईल का ?


Log in or register to post comments


नक्कीच देता येईल

28 Jan 2021 - 4:47 pm | दिलीप वाटवे

ही घ्या. पहिलं स्फुट लिखाण फेसबुकवर ६ अॉक्टोबर २०१६ ला केलंय. हा त्याचा धागा.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=651504645023750&id=100004926...


त्यानंतर मी हा ब्लॉग १४ अॉक्टोबरला पोस्ट केलाय.

https://watvedilip.blogspot.com/2019/10/blog-post.html


दुर्गविहारींनी हा लेख २०२० ला लिहिलाय. मी माझ्या लेखात दिलेले सगळे संदर्भ दाखवू शकतो. त्याशिवाय जावळी सुभ्यातल्या सगळ्या घाटवाटा मी प्रत्यक्ष हिंडून पाहिलेल्या आहेत. प्रत्येक घाट आणि गाव मी pin point करून दाखवू शकतो. दुर्गविहारींच्या बाबतीत हा प्रकार आज पहिल्यांदा झालेला नाही. ज्यांच्या बाबतीत असे पूर्वी घडलेय अशी दोघेजण माझ्या माहितीत आहेत.


Log in or register to post comments


नक्कीच देता येईल

28 Jan 2021 - 4:48 pm | दिलीप वाटवे

ही घ्या. पहिलं स्फुट लिखाण फेसबुकवर ६ अॉक्टोबर २०१६ ला केलंय. हा त्याचा धागा.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=651504645023750&id=100004926...


त्यानंतर मी हा ब्लॉग १४ अॉक्टोबरला पोस्ट केलाय.

https://watvedilip.blogspot.com/2019/10/blog-post.html


दुर्गविहारींनी हा लेख २८ अॉगस्ट २०२० ला लिहिलाय. मी माझ्या लेखात दिलेले सगळे संदर्भ दाखवू शकतो. त्याशिवाय जावळी सुभ्यातल्या सगळ्या घाटवाटा मी प्रत्यक्ष हिंडून पाहिलेल्या आहेत. प्रत्येक घाट आणि गाव मी pin point करून दाखवू शकतो. दुर्गविहारींच्या बाबतीत हा प्रकार आज पहिल्यांदा झालेला नाही. ज्यांच्या बाबतीत असे पूर्वी घडलेय अशी दोघेजण माझ्या माहितीत आहेत.


Log in or register to post comments


ह्याआधी सुद्धा दुर्गविहारी

28 Jan 2021 - 9:59 pm | बंकापुरे

ह्याआधी सुद्धा दुर्गविहारी (स्वप्निल जिरगे) ने माझ्या /साई च्या ब्लॉग मधून फोटो चोरले होते... नंतर खुलासा करायचा निष्फळ प्रयत्न केला होता...

संदर्भ : https://misalpav.com/node/42062


@दुर्गविहारी (स्वप्निल जिरगे): आपल्याकडे स्वतःचं काही लेखन कौशल्य आहे असं वाटतं नाही... तुम्ही भलेही अनेक वर्ष ट्रेकिंग करत असाल पण खऱ्या भटक्या ट्रेकर्सने मनापासून स्वरचित लिहिलेल्या लेखांची चोरी करून "भटकंती" ऐवजी "काथ्याकूट" मध्ये लिहून तुम्ही तुमची चोरी लपवण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी तो एरव्हीचं सापडणार आहे... जमल्यास स्वतःचं लेखन कौशल्य वापरून लिहावे हि नम्र विनंती...


Log in or register to post comments


चुक आहे

28 Jan 2021 - 10:44 pm | स्वच्छंदी_मनोज

जर का मुळ लेखातले टेक्स्ट तसेच्या तसे कॉपी करुन दिले असेल तर फक्त रेफेरन्स म्हणून नाव देणे अत्यंत चुकीचे आहे.

दुर्गविहारींच्या अश्याच एका लेखात माझ्या पुर्विच्या दुसर्‍या एका लेखातले फोटो दिले होते तेच्या तर त्यांनी संदर्भ म्हणून पण माझे माव दिले नव्हते. त्यांच्याशी या बाबत पर्सनल वर चर्चा (वादच म्हणायला पाहीजे) झाल्यावर मोठ्या कष्टाने लेख एडीट करुन माझे नाव संदर्भ म्हणून दिले गेले.

हा पायंडा चुकीचा पडतोय...


Log in or register to post comments


सहमत आहे.

28 Jan 2021 - 11:20 pm | प्रचेतस

सहमत आहे.

असे असेल मूळ लेखकाची पूर्वपरवानगी घेऊन त्याला योग्य ते श्रेय दिले गेलेच पाहिजे असे वाटते.


Log in or register to post comments


सहमत आहे ....

30 Jan 2021 - 4:05 pm | गामा पैलवान

प्रचेतस,


तुमच्याशी या बाबतीत सहमत आहे.


आ.न.,

-गा.पै.


Log in or register to post comments


http://misalpav.com/user

28 Jan 2021 - 9:45 pm | बंकापुरे

http://misalpav.com/user/29001


Log in or register to post comments


दिलीप गेली तिस एक वर्षे तरी

31 Jan 2021 - 10:44 pm | प्रमोद पानसे

दिलीप गेली तिस एक वर्षे तरी ट्रेकिंग करतोय.गड किल्ल्यांच्या अभ्यासात त्याची बरोबरी असलेला अजुनतरी कुणी भेटला नाहीये मला.


Log in or register to post comments


छान माहिती

18 Feb 2021 - 12:10 am | Rajesh188

आणि अभ्यासपूर्ण लेख काही तरी चांगले वाचल्याचे समाधान मिळाले.

कुठेच अतिशोकती नाही विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण लिहलेले वर्णन


Log in or register to post comments

मिसळपाववर स्वागत!



दिवाळी अंक २०२०



अनुक्रमणिका


दिवाळी अंक २०२०


सदस्य आगमन

सदस्यनाम *

संकेताक्षर *

मिसळपावचे सदस्य व्हा !

नवीन संकेताक्षर बोलवा.

प्रवेश करा

हॉटेलात आलेली माणसं

सध्या 18 सदस्य हजर आहेत.


आनन्दा

Amol McDermott

चौथा कोनाडा

कपिलमुनी

स्वराजित

लल्लु

सतिश गावडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेकार तरुण

मराठी_माणूस

योगेश कोलेश्वर

यश राज

अंतु बर्वा

कुमार१

तुषार काळभोर

सविता००१

स्वलिखित

गवि

भाषा बदला.

मराठी

English

बदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.

मिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:

1 आम्ही कोण?

2 मिसळपावचे अधिकृत धोरण

3 सदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे

नवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:

1 सदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही

2 काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे

3 आंतरजालावर वापरल्याजाणारी लघुरूपे

अभिप्राय देण्याविषयी:

1 मिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.

2 कृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.

3 सदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.

साहित्य संपादकांविषयी:

1 नमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.

2 त्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

© 2021 Misalpav.com, All rights reserved.

Disclaimer · Privacy policy · Login

टिप्पण्या