कविता
**प्राजक्त ... एक सुंदर चारोळी.... 'सकाळी अंगणातला पारिजात, फुलांचा सडा टाकून मोकळा होतो रिते होण्यातले समृद्धपण, तो किती सहजपणाने दाखवतो' अर्थात....फुलंच ती.... इलुशी...नाजुक....त्यांचा भार तो कितीसा असणार ! आणि काहीही झालं तरी 'सृजनाचा' कुठे कधी भार होत असतो का ? 'हलका झाला'... पण म्हणून पोकळी नाही निर्माण झाली. 'मोकळा' झाला पण रिता झाला असेल का खरंच ? मला नाही तसं वाटत ! 'रितं' होण्यासाठी 'रिकामं' असावं लागतं मुळात. प्राजक्ताकडे हे रिकामपण नक्कीच नाही. तो केव्हाच पुन्हा सृजनाच्या त्या सुंदर प्रक्रियेत मशगुल झाला. उद्यासाठी तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय.... फुलांना फुलवायचंय....प्रत्येकात सुगंधाची कुपी लपवायचीये ...शिवाय देठादेठात केशर ! मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला...तो काही माणूस नाही नं. जणु ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून सुटतात, तत्क्षणी तो त्या फुलांवरचे, सारे हक्कही सोडतो... आजची फुललेली सारी ...